Saturday 14 April 2012

म्हारो प्रणाम...

मेघनाने हा खो दिल्यावर कोणाबद्दल लिहू हा प्रश्न खरं तर पडलाच नाही. पण काय काय लिहू आणि कसं लिहू हे मात्र अद्याप आहेत. कारण आपल्याला भयानक आवडणार्‍या कुठल्याही गोष्टीबद्दल समोरच्याला सांगताना शक्यतो संयतपणे सांगावं, नाहीतर समोरच्याला तो अतिरेक वाटून तो आपल्याला तरी कंटाळतो किंवा आपण ज्या गोष्टीबद्दल सांगतोय त्याबद्दल तरी अनास्था निर्माण होऊ शकते. आणि माझा पूर्वानुभव असं सांगतो की, मी 'किशोरी आमोणकर' या व्यक्तीबद्दल बोलताना बेभान होतो. मला फार उशिरा कळतं, की प्रथमेश बास! समोरच्याचा विचार कर...

किशोरी आमोणकर. या बाईंबद्दल खरंच काय बोलू? हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातला एक चमत्कार म्हणू? की 'चित्रपटसृष्टीला पडलेलं सुरेल/चिरतरुण/सुंदर स्वप्न' या चालीवर काही म्हणू?

खरं तर त्यांच्या गाण्याविषयी काही बोलावं, म्हणावं इतकीही माझी औकात नाही याची पूर्ण जाणीव आहे मला. पण तरीही काहीतरी म्हणायचा मोह आवरत नाहीये...

मला त्या नेहमी एखाद्या बेटासारख्या वाटतात. संगीताच्या महासागरात तेजस्वीपणे उभं असलेलं बेट. ज्याला त्या बेटावरच्या सुरांची जादू कळल्ये, त्याला त्या बेटाच्या आजूबाजूला घुटमळण्याचं अनिवार आकर्षण वाटणारच. त्या महासागरातल्या सगळ्या उलथापालथींनी, त्यातल्या सगळ्या वार्‍यावादळांनी, लाटांचे तडाखे बसावेत तशा उठलेल्या टीकेच्या झोडीनं, कशानंही लोपून, दबून जाता, आपल्या स्वरसामर्थ्यानं सगळ्याला टक्कर देत उभं असलेलं बेट. त्या बेटावर यायला सरसकट कोणालाही परवानगी नसावी. काही पुण्यवान माणसांनाच तो योग लाभलेला. आणि ज्यांना तो योग लाभलाय त्या समस्त मंडळींवर जळणारे माझ्यासारखे लोक अल्पसंख्याक नसावेत.

मला त्यांचं पहिलं जे गाणं 'क्लिक' झालं, ते होतं मीरेचं 'म्हारो प्रणाम' हे भजन.
त्यातल्या 'बाके बिहारी जी'मधले 'के', 'हारी', 'जी' हे तुकडे; नंतरचं 'रिझरिझावा' सगळंच मोहून गेलं. प्रत्येक कडव्याची दुसरी ओळ घेताना ती जरा हलकी खेचून गायल्ये असं वाटलं. मशीनमधून भरभर वेटोळत बाहेर येत असलेलं सॉफ्टी आईसक्रीम एकदम स्लो-मोशनमधे करून बघताना कसं वाटेल तसं काहीसं. त्याची पारायणं केली. मग अजून नवीन काही ऐकायची तहान लागली. तेव्हा त्यांच्या गायकीनं डोक्यातली जी जागा व्यापली ती कधी सोडलीच नाही. त्यांना जितकं अधिक ऐकलं तितकी ती जागा अधिक पक्की होत गेली. मग तोडीमधलं 'बेगुन गुन गाइ', नंतरचा 'ताना नादीर दीम दीम' हा तराणा; अहिरभैरवातलं 'सखिया म्हारा' आणि 'नैनवा बरसे'; यमनातलं 'एरि आली पियाबिन'; भैरवीतलं 'अब रतीया किधर गवाइ', 'कोयलिया ना बोल डार' ही ठुमरी, पं.चौरसियांबरोबरची 'बाबुल मोरा' ही जुगलबंदी आणि त्यांचा 'भूप'...
कलत चाललेला दिवस, साडेपाच-पावणे सहाचं थोडं पिवळसर ऊन, अशा शांत संध्याकाळी हत्तीवर अंबारीत बसून गावात रपेट मारणारा राजा. पण आनंदी शांतता नाही, थोडी खिन्न शांतता... हे चित्र उभ राहातं त्यांचं 'एरि आज भईलवा'मधला जीवघेणा 'भईलवा' ऐकताना आणि नंतरचं 'सहेला'ला केलेलं आर्जव ऐकताना...
आणि अजून काय काय...
सगळंच वेड लावणारं. हे फक्त उथळ उल्लेख. स्वतःचे राग-लोभ विसरून, तुम्ही जो राग ऐकताय तोच तुम्ही होता. ही अवस्था अजून कोणाला ऐकताना कधी होईल का? नाहीच कदाचित...
आणि आता मी ती डोक्यातली जागा कायमस्वरूपी बाईंच्या नावावर केल्ये. अतिरेक वाटतोय? हरकत नाही... हक़ीक़त आहे. मला त्या 'चढल्या' आहेत.

आपण फक्त एवढंच नोटीस केलं की, 'आज माझा सूर लागत नाही' असं म्हणत गाताच बाई प्रेक्षकांची माफी मागून निघून गेल्या. किंवा ग्रीन्ररूममधून बाहेर येऊन स्टेजवर जाताना कोणी मधे आलं तर बाई चिडतात. किंवा त्या साथीला बसलेल्यांचा भर मैफिलीत अपमान करतात. साउंड सिस्टमवाले म्हणजे तर त्यांचं हक्काचं गिर्‍हाईक इत्यादी. अशा त्यांच्याबद्दलच्या अनेक वदंता ऐकत असताना हळूहळू कळायला लागलं की, त्यांच्या त्या वागण्यामागे काही ठोस विचार आहे आणि क्वचितप्रसंगी त्यांच्या काही मर्यादाही. त्यांच्यावर गुरूकडून झालेले संस्कार, गुरूची शिकवण यांच्याबरोबरच स्वत:ची उपजत बुद्धी, स्वराची साधना, अभ्यास ह्या सगळ्यातून तयार झालेलं ते अलौकिक रसायन आहे.

बंदिशीतल्या शब्दांना अनुरूप असा भाव गाण्यात उतरवण्यार्‍या (शास्त्रीय संगीतामधे शब्दाला, शब्दार्थाला दुय्यम महत्त्व या पारंपरिक समजाला छेद देत), रागाच्या सादरीकरणाचा प्रस्थापित साचा मोडण्यार्‍या (त्याला प्राचीन स्वरशास्त्राचं अनुष्ठान देत), आलाप-ताना करताना सरगम घेऊन किंवा मंद्र आणि तार सप्तकातल्या टोकांना उगाच आवाज नेत आपली माध्यमावरची हुकूमत दाखवली की टाळ्या मिळतात, हे जाणूनसुद्धा त्या प्रकारापासून लांब राहणार्‍या, गाणं सुरू करण्यापूर्वी आणि मैफल संपल्यावर गुडघ्यावर बसून श्रोत्यांच्यासमोर डोकं टेकवून त्यांचे आशीर्वाद घेणार्‍या, श्रोत्याच्या मनोरंजनापेक्षा त्याच्या आतल्या 'मी'चं आणि राग-भावाचं अद्वैत कसं होईल याचा विचार करणार्‍या, घराणेशाहीची झापडं काढून एकसंध, सलग संगीतविश्वाचा आग्रह धरणार्‍या , सुरुवातीला बर्‍यापैकी ओपन थ्रोटेड वाटणारं त्यांचं गाणं परिपक्व होत जाताना आता एकदम सबड्यू होऊन गाणार्‍या, "मला जे म्हणायचंय ते अस्थायीमधेच म्हणून झालेलं असताना, माझ्याकडे नवीन काही मांडायला उरलेलं नसताना, मी केवळ फॉरमॅट फॉलो करायला म्हणून अंतरा गायचा का? हा विचार करणार्‍या , 'वयोमानाप्रमाणे आवाजाला कंप येतो' या कल्पनेतून आलेली भीती इतकी वर्षं मी ज्या सुरांची सेवा केली, ज्यांचे पाय घट्ट पकडून ठेवले, तेच सूर आता मलाच सोडून नाही ना जाणार?" असं म्हणून व्यक्त करणार्‍या, गायकामधला 'मी' जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत सच्च्या सुराला शरण जाता येत नाही असं मानणार्‍या आणि हे आपल्या शिष्यांमधे हे उतरवण्यासाठी कठोर शिस्त पाळणार्‍या आणि पाळायला लावणार्‍या , पण त्यांच्यावर आईसारखं प्रेमही करणार्‍या... आणि मुख्य म्हणजे या क्षेत्रात इतकं अढळ स्थान मिळूनही; चॅलेंजेस, स्पर्धा, टीका या सगळ्यापलीकडे पोहोचूनही; बनचुकेपणाचा लवलेशही येऊ देता अजूनही एका विद्यार्थाच्या वृत्तीने गाण्याकडे बघणार्‍या अशा बाई...

देवानं आपल्यावर फार मेहेरबान होऊन यांना पाठवलंय आणि मला खात्री आहे की त्यांनी हा 'किशोरी आमोणकर' नावाचा साचा त्यांना बनवून लगेच मोडून टाकला असणार. कारण अर्थातच असे चमत्कार वारंवार करण्याइतका तो दयाळू वगैरे नाही. पण आमचे कालखंड थोडे का होईना ओव्हरलॅप झालेत आणि मला त्यांना प्रत्यक्ष ऐकण्या-पाहाण्याचं भाग्य लाभलंय यासाठी मी त्याचा ऋणी आहे. नतमस्तक व्हावंसं वाटताना देव्हार्‍यातल्या देवाच्या आधी जी आठवते, जिला वारंवार ऐकणं हे जप-जाप्याइतकंच पवित्र वाटतं, अशा या गानसरस्वतीचे आम्ही भक्त आहो हेही आमचं सौभाग्यच नाही का?

3 comments:

  1. ’कलत चाललेला दिवस, साडेपाच-पावणे सहाचं थोडं पिवळसर ऊन, अशा शांत संध्याकाळी हत्तीवर अंबारीत बसून गावात रपेट मारणारा राजा. पण आनंदी शांतता नाही, थोडी खिन्न शांतता...’
    गाणं ऐकताना इतकं काय काय होतं, हे मला ठाऊक नव्हतं. शेवटी आपल्याला त्या त्या गोष्टी ’भेटाव्या’ लागतात, हेच खरं! मला शास्त्रीय संगीत अजून तरी तसं भेटलेलं नाही. सुराकडे लक्ष प्रयत्नपूर्वक वळवलं, तरी मला शब्दच ऐकू येत राहतात.
    बाय दी वे, खो फक्त घ्यायचा नसतो, द्यायचापण असतो!

    ReplyDelete
  2. Really very good!!.. Excellent!!! Keep it up my frd!!

    ReplyDelete
  3. Mazyatala MI mazyapasun vegla hoto ani ya baichya pathi vedyasarkha odhala jato....
    ani ti odh kahi kelya sampatch nahi kimbhuna vadhatch jate. ए रि आज भईलवा सुखवा मोरे जिया की सुन सुन पिया की बातें ।
    hansdhwani madhla aaj sanaj sang aikla ki ek veglich janiv hona.... pratyek veles... kadhi thambnar he.... thambuch naye...

    ReplyDelete